मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आॅक्सिजनचा वापर दोन महिन्यात दुपटीने वाढला आहे. कोरोना रुग्णांमध्ये आॅक्सिजनची पातळी कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनच्या अखंडित पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यभरात उत्पादक वाढविण्यापासून ते पुरवठादारांची साखळीही सुरळीत राखण्याचा प्रयत्न वेगाने होत असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली आहे.लॉकडाऊनपूर्वी दिवसाला दररोज २०० ते ३०० टन आॅक्सिजनची गरज होती; आता दिवसाला ४५०-५०० टन आॅक्सिजन लागत आहे. सध्या ग्रामीण भागासह शहरांतही आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात आठवड्याभरात चौदा जिल्ह्यांत लिक्विड आॅक्सिजन प्लांट तयार करण्यात आले असून, १६ जिल्ह्यांत आॅक्सिजन लिक्विड प्लांटचे काम सुरू आहे. हे प्लांट लवकरच सुरू होतील.राज्यात पुरेसा आॅक्सिजनचा साठा आहे. मात्र, त्याच्या वितरणात अडथळे येत असल्याने आॅक्सिजनची कमतरता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थितीही लवकरच सुधारेल, अशी माहिती आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारीडॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.राज्याचे कोरोना टास्क फोर्समधील सदस्य डॉ.अविनाश सुपे यांनी सांगितले, गेल्या १५ दिवसांत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. साहजिकच गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून, त्यांना आॅक्सिजनची गरज पडत आहे. आजच्या घडीला एकूण रुग्णांपैकी १३ टक्के रुग्णांना आॅक्सिजन द्यावा लागत आहे. आॅक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांत वाढ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. अजूनही आपल्याकडे रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होतात. बºयाच प्रकरणांमध्ये लक्षणे अंगावर काढून त्यानंतर चाचणी केली जाते, शिवाय यात पुन्हा रुग्ण अतिजोखमीच्या गटातील असेल, तर रुग्णाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे याची नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचेही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.उपलब्धता सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्नराज्यातील रुग्णवाढीचा आलेख पाहता, टास्क फोर्ससह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याविषयी अभ्यास सुरू आहे. रुग्णवाढीचे निरीक्षण करून आॅक्सिजनची आणि आॅक्सिजन खाटांची उपलब्धता सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्हे आणि महापालिकेकडून पंधरवड्याने रुग्णवाढ, बरे होणारे रुग्ण, गंभीर रुग्ण यांची आकडेवारी जमा करणे सुरू आहे. यानुसार, जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना आॅक्सिजन खाटा-आॅक्सिजनचा साठा वाढविण्याचे आदेश देणे सुरू आहे, अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:23 AM