पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या निकषामध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे मुख्य परीक्षेसाठी एकूण पदांच्या १२ पटींऐवजी १५ ते १६ पट विद्यार्थी पात्र ठरविले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणा-या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी आयोगाने भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या १२ पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट आॅफ ठरविले जात होते. आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या पुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या १५ ते १६ पट विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. पूर्व परीक्षेचे कटआॅफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणार आहे.राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. लाखो विद्यार्थी विविध परीक्षा देत असले तरी तुलनेने पदभरतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतानाही मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. पूर्व परीक्षेत चांगले गुण मिळवूनही हजारो विद्यार्थ्यांची संधी एका गुणामुळेही दवडली जाते. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आता मुख्य परीक्षेतील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.--------पूर्व परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी एक-दोन गुणांनी मुख्य परीक्षेपासून मुकतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी दिली तर स्पर्धा वाढेल. त्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी मिळतील. तसेच पूर्व परीक्षेत कमी गुण मिळाले तर अनेकांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मुख्य परीक्षेचे पात्रतेचे प्रमाण वाढविले, स्पर्धा परीक्षा देणा-या लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:44 PM