मुंबई - महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना 6 हजार रूपये वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ 1500 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना होणार आहे.महानिर्मितीत पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआय नंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून समावून घेण्यात येते. सध्या आयटीआय प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना सुरूवातीच्या 3 वर्षासाठी 8000 रूपये आणि 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर 10,000 रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना दरवर्षी 500 रूपये वेतनवाढ देण्यात येते.आयटीआयधारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना औष्णिक वीज केंद्रतील कंत्राटी कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळण्याची विनंती ऊर्जामंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली. महानिर्मितीत कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी वर्गवारी करण्यात येते.प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून 5 वर्षा पेक्षा अधिक कालावधीची सेवा झाली असलेल्या प्रशिक्षणार्थीला सध्या 10,000 रूपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्यात येऊन 16 हजार करण्यात आले. दोन ते 5 वर्ष सेवा झालेल्या प्रशिक्षणार्थीला सध्या 9000 रूपये मिळत होते. त्यात वाढ करून हे मानधन 15000 रूपये करण्यात आले. 2 वर्षापर्यंत सेवा कालावधी झालेल्या प्रशिक्षणापर्यंत आतापर्यंत 8000 रूपये मानधन देण्यात येत होते. आता ते 14 हजार रूपये करण्यात आले.एकूण 1500 प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रत्येकी 6 हजार रूपये वाढ करण्यात आली. 5 वर्षांपेक्षा अधिक सेवा असणारे प्रशिक्षणार्थी 235 आहेत. दोन व पाच वर्षाच्या कालावधीत सेवा देणारे 759 प्रशिक्षणार्थी आहेत. 2 वर्षे सेवेत असणारे प्रशिक्षणार्थी 518 आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींच्या मानधनावर सध्या 1 कोटी 33 लाख रूपये खर्च होत होता, ते आता 2 कोटी 23 लाख रूपये होईल.
महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात 6 हजार रूपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 7:44 PM