ऑनलाइन लोकमत
मुंबई.दि.6 - राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने त्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, "यंदा राज्यात सर्वत्र झालेला समाधानकारक पाऊस आणि राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजना यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ते गेल्या वर्षापेक्षा तिपटीने अधिक अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात सोयाबिनचे दर घसरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. तसेच शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी विविध उपाययोजनाही लवकरच अंमलात आणण्यात येतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल."