मुंबई : राज्यात यंदा सोयाबीनचे प्रचंड उत्पादन झाल्याने दर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.यंदा समाधानकारक पाऊस आणि राज्य शासनाच्या उपाययोजनांमुळे सोयाबीनचे उत्पादन वर्षीपेक्षा तिपटीने वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात सोयाबीनचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी राज्य शासनाने किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी आणखीही काही उपाययोजनाही लवकरच अमलात आणण्यात येतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविल्यास शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
सोयाबीनवर आयात शुल्क वाढवावे
By admin | Published: November 07, 2016 6:43 AM