मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागल्याबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, की राज्यात आतापर्यंत एच१ एन१ बाधितांची संख्या ४०५ आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एच३ एन२ बाधित रुग्णांची संख्या १९५ असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३०८ इतकी आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, ४ हजारपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृद्ध यांना तर आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरित केला आहे, असे सांगितले.
मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे टाळाराज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
ऑक्सिजनचा पुरेसा साठाराज्यात ५२३ ऑक्सिजन प्लांट असून ५५२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. ३७० एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टँक, ५६ हजार ५५१ जम्बो सिलिंडर, २० हजार छोटे सिलिंडर्स, १ हजार ड्युरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी १ हजार ५८८ कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा ५१ हजार ३६५, ऑक्सिजन बेड ४९ हजार ३९६, आयसीयू बेड १४ हजार ३९५, तर व्हेंटिलेटर बेड ९ हजार २३६ आहेत.