लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘जगातील बदलती भूराजकीय परिस्थिती बघता भारतीय उपखंडातील समुद्र आणि इंडो-पॅसिफिक सागरी सीमात भारतीय नौदलाने दबदबा कायम ठेवण्यासाठी टेहळणी वाढविणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ संस्थेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. नौदलासाठीच्या अविरत सेवेत असलेल्या या संस्थेला ‘राष्ट्रपती निशाण’ (प्रेसिडेंट कलर) हा सर्वोच्च सन्मान गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते बहाल करण्यात आला. संस्थेचे निशाण अधिकारी लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंग यांनी त्याचा स्वीकार केला. या प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह, नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल कुमार चावला, ‘आयएनएस शिवाजी’चे प्रमुख कमोडोर रवनीश सेठ उपस्थित होते. कोविंद म्हणाले, जगभरातील बहुतांश व्यापार हा समुद्रीमार्गाद्वारे होत असल्याने अर्थकारणाच्या वृद्धीमध्येही नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.ंअसे आहे निशाणसात फूट उंच आणि पांढऱ्या रंगाच्या या निशाणावर भारतीय ध्वजासह नौदलाचा ध्वज आहे. या ध्वजावर रेशीम धाग्यांनी सुवर्णसिंह मुद्रा रेखाटण्यात आल्या आहेत. पूर्वी युद्धात जिंकल्यावर संबंधित ठिकाणी ध्वज लावण्यात येत होता. हा ध्वज विजयाचे प्रतीक असायचा. ब्रिटिशांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे.लोणावळा येथे १९४५ मध्ये स्थापन झालेली ‘आयएनएस शिवाजी’ संस्था भारतीय नौदल, तटरक्षक दल, मित्रराष्ट्रांच्या नौदलाचे अधिकारी; तसेच इतर दलांतील सैन्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते.