मुंबई : राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.यापूर्वी दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट हल्ल्यांतील पीडितांना एक लाख रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम दिली जायची. मात्र आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. तर केंद्र सरकारने नुकसानभरपाईची रक्कम तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविल्याचे खंडपीठाला सांगितले.दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोटातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारने दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली. बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्याचा आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले राजेश्वर पांचाळ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे नुकसानभरपाईची रक्कम द्यायची, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखल्याची माहितीही खंडपीठाला दिली. नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना मृत व्यक्तीचे राहणीमान, त्याचे वेतन आणि त्याच्यावर किती जण अवलंबून होते आदी बाबींचा विचार करावा आणि त्यानुसार त्याला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती. (प्रतिनिधी)- यापूर्वीच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचे खंडपीठाला सांगितले होते. नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचे पोलीस उपायुक्त अश्विनी सानप यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला सांगितले होते.
बॉम्बस्फोटपीडितांच्या नुकसानभरपाईत वाढ
By admin | Published: January 15, 2017 2:12 AM