जालना - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना एका चिमुरडीने पत्र पाठवत अनोखी मागणी केली आहे. पहिलीत शिकणाऱ्या श्रेया हराळे या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल, पगार कमी असल्याने त्यांना ओव्हर टाइम करावा लागतो अशी व्यथा मांडली आहे.
एसटी कर्मचारी सचिन हराळे यांच्या पहिलीतल्या मुलीने केलेली निरागस मागणी सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. पगार कमी असल्याने पप्पांना जास्त वेळ काम करावं लागतं. त्यामुळे ते मला वेळ देत नाहीत अशी तक्रार पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पप्पांचा पगार वाढविला तर त्यांना ओव्हर टाइम करावा लागणार नाही मग ते मला वेळ देतील अशी विनंती श्रेयाने मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंकडे केली आहे.
श्रेया हराळेने लिहिलेलं पत्र‘आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. मी मासोदरीह इंग्लिश स्कूल अंबडच्या पहिल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर मला म्हणतात 'सोनू बेटा मला ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे म्हणून'. आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझी विनंती आहे तुम्हाला. माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना. मग माझे पप्पा मला शाळेत सोडायला येतील आणि ओव्हर टाइम सुद्धा करणार नाही. माझे पप्पा खूप चांगले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वेतन करारासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील शिल्लक रकमेचे वाटप एसटी कर्मचाऱ्यांना करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने घातले आहे. चार हजार ८४९ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. यातील एक हजार १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम शिल्लक राहात असल्याचा दावा त्यांनी केला होता. अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आपल्याला माध्यमातून पाहायला मिळत असतात. काही कर्मचाऱ्यांनी कामाच्या तणावाखाली आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे जालनाच्या श्रेयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केलेली ही निरागस मागणीला काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.