पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांना पालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जाते. त्यासाठीचा गत दोन वर्षांपूर्वीपर्यंत फक्त ४५ लाख रुपये खर्च येत होता; मात्र मागील दोन वर्षांत हा खर्च एकदम अडीच कोटी रुपये झाला आहे. इतका खर्च करून दिले जात असलेले पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला.कचरा डेपो असल्यामुळे उरुळी देवाची, तसेच फुरसुंगी या गावांमधील पाणी दूषित होत असल्याची तक्रार संबंधित गावांमधील नागरिकांनी केली होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पालिकेने या गावांना टँकरने पाणी पुरवण्याची जबाबदारी तर घेतलीच शिवाय तिथे काही विकासकामेही करून देण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे पालिकेने तिथे आतापर्यंत तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात पाण्यासाठी साधारण ४५ लाख रुपये खर्च येत होता.मागील दोन वर्षांत फक्त पाण्याच्या टँकरसाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च शंकास्पद असल्याचे बालगुडे यांचे म्हणणे आहे. काही विशिष्ट लोकांकडून पालिका देत असलेले पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. विकासकामे करून देत आहे, मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, असे ते म्हणाले. काँक्रीटीकरण करून घेणे, डांबरीकरण करणे याबरोबरच अनेक कामे पालिकेकडून करून घेतली जात आहेत व आता खर्च करून दिले जात असलेल्या पाण्याचाही गैरवापर होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अडीच कोटी रुपये खर्च करून दिलेले टँकर नक्की जातात कुठे? याचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टँकर खर्चातील वाढ संशयास्पद
By admin | Published: April 28, 2016 12:59 AM