वडापुरी : वाढलेल्या उन्हामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे. फेब्रुवारी ते मे महिना हा उन्हाळ्याचा कालावधी मानला जातो. परंतु, सध्या पहाटे थंडी, तर दिवसा कडक उन्हाळा नागरिक अनुभवत आहेत.शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेपासून बचाव होण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांची गरज व मागणी ओळखून रसवंतीगृहे, कोल्ड्रिंक्स दुकाने उघडली गेली आहेत. या शिवाय विविध प्रकारच्या टोप्या, गॉगल विक्रीसाठी सर्वत्र आले आहेत. उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेले मातीचे माठ बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बनविलेल्या मातीच्या माठाला आत्तापासूनच मागणी वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे.सध्याच्या स्थितीत तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने लहान मुलांसाह वयोवृद्ध या झळामुळे हैराण आहेत.रानातील ज्वारी, हरभरा, गहू आदींची काढणी वेगाने सुरू असताना शेतकरी व शेतमजुरांना वाढत्या उन्हाचा सामना करण्याची वेळ आली आहे. सध्या पडलेल्या उन्हाचा तडाखा पाहता पावसाळ्यापर्यंत उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार असल्याचे जाणवत आहे.
इंदापूर तालुक्यात तापमानात वाढ
By admin | Published: February 27, 2017 1:02 AM