मुंबई : नाशिक औष्णिक विद्युत केंद्राने आपली वीजनिर्मिती ३ हजार ८० दशलक्ष युनिटवरून ३ हजार ३२४.८५ दशलक्ष युनिटपर्यंत वाढविली आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत इंधन तेलाच्या वापरासह कोळशाच्या वापरातही बचत करून, तब्बल १३.८७ कोटी रुपयांची बचत केली आहे, असा दावा महानिर्मितीने केला आहे.महानिर्मितीच्या संचलन पुनर्निरीक्षण संघाच्या आयोजित सभेत ही माहिती देण्यात आली असून, केंद्राबद्दलच्या अनेक घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. येथील संच ३५ वर्षे जुना असूनही वेळोवेळी कठीण प्रसंगावर केंद्राने मात केली आहे; शिवाय देशात हा संच कामगिरीबाबत २०व्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत संचाने देशात २५च्या आत आपले स्थान कायम ठेवले आहे आणि महानिर्मितीच्या समकालीन संचात हा संच कायम प्रथम क्रमांकावर राहिला आहे. महानिर्मितीच्या संचात सर्वांत जास्त काळ म्हणजे, एप्रिल महिन्यापासून हा संच सुरू आहे. या संचाच्या संचलनाकरिता विजेचा वापर ५.७ टक्के कमी करण्यात आला असून, त्यामुळे सुमारे २५.९८ कोटींची बचत झाली आहे. संचातील फ्लाय अॅशचा वापर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असून, पाण्याचा पुनर्वापर ९० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे, अशी माहिती महानिर्मितीच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
औष्णिक केंद्रातील वीजनिर्मितीत वाढ
By admin | Published: January 11, 2016 2:30 AM