सिंधुदुर्ग: रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने येथील तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील आळवाडी-मच्छीमार्केट बाजारपेठेत घुसले. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान पहाटे अंधारातच सुरक्षितस्थळी हलविले. दुपारी येथील पाणी ओसरले, मात्र पावसाची संततधार दिवसभर सुरूच होती.
बांदा शहर व परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी मच्छीमार्केट परिसरात भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याची पातळी वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात. सकाळी तलाठी वर्षा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी पाहणी करत स्थानिकांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्यात. तसेच नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिक यांची भेट घेत विचारपूस केली.
आळवाडी येथील मच्छीमार्केट इमारतीत पुराचे पाणी घुसले होते. येथील आळवे यांच्या हॉटेल पर्यंत पुराचे पाणी होते. मात्र आळवाडी-निमजगा रस्ता पहाटेच पाण्याखाली गेला होता. येथील छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटर मध्ये अचानक पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा देखील सखल भागात पाणी आल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर दिवसभर कायम असल्याने पूर प्रवण क्षेत्रातील नागरिक चिंतेत आहेत. निमजगा येथील भंगार वस्तीत आजही गटार तुंबून पावसाचे पाणी घरात घुसले.
एनडीआरएफचे पथक फिरकलेच नाही
जिल्हा प्रशासनाने बांदा शहर हे पूर प्रवण असल्याने सावंतवाडी तालुक्यासाठी जोखमीच्यावेळी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. या पथकाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहरातील तेरेखोल नदी व पूर प्रवण क्षेत्राची पाहणी केली होती. आज पहाटेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. दुपारपर्यंत याठिकाणी पूरस्थिती होती, मात्र प्रशासनाचे एनडीआरएफचे पथक याठिकाणी फिरकलेच नाही.