लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या उन्हात ५ रुपयांत एक लीटर शुद्ध पाणी देणाऱ्या वॉटर वेंडिंग मशीनमुळे प्रवासी सुखावले आहेत. रेल नीरऐवजी प्रवासी मोठ्या संख्येने वॉटर मशीनपुढे रांगेत उभे राहणे पसंत करत आहेत. यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांत वॉटर वेंडिंग मशीन वाढवा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (आयआरसीटीसी) हे मशिन बसवण्यात येत आहे. मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या सर्व मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सद्य:स्थितीत चारही मार्गांवर मिळून ४० ते ४५ मशीन सुरू आहेत.रेल्वे स्थानकांत रेल नीर वगळता अन्य उत्पादकांच्या पाण्याच्या विक्रीला बंदी आहे. रेल नीरची एक लीटर पाण्याची बाटली २० रुपयांनी स्थानकावर मिळते. मात्र वॉटर वेंडिंग मशीनमुळे एक लीटर पाणी अवघ्या ५ रुपयांत मिळते. परिणामी प्रवाशांकडून रेल नीरपेक्षा वॉटर वेंडिंग मशीनला पसंती मिळत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोरीवली, विरार अशा सर्व स्थानकांत या मशीन त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहे.रेल्वेच्या चारही मार्गांवरील स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसवण्याची तयारी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व स्थानकांवर मशीन बसवण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत मध्य आणि पश्चिम मार्गावर आणखी ४०-५० मशीन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीचे पिनाकीन मोरावाला यांनी दिली.
वॉटर वेंडिंग मशीन वाढवा रेल्वे प्रवाशांची मागणी
By admin | Published: May 14, 2017 1:36 AM