भोसरी : पुणे-नाशिक रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात अनुक्रमे १५ व १६ वर्षांचे युवक गंभीर जखमी झाले. वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभवही नसणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हाती दुचाकी देणे किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे. परवाना असल्याशिवाय वाहन चालवण्यास पालकांनी मुलांना परवानगीच देऊ नये. तसेच पोलीस प्रशासनाने अल्पवयीन मुलांच्या धूम स्टाईलवर कारवाई करण्याची गरज आहे. मुलांचे हट्ट व त्याला पालकांची मूकसंमती यामुळेच अशा गंभीर समस्या उद्भवत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्याच्या काळात घरोघरी दुचाकी वाहने असतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीतून वाट काढताना जिथे प्रशिक्षित, अनुभवी चालकांना कसरत करावी लागत आहे, तिथे वाहन चालवण्याचा अनुभव नसणारे वाहनचालक म्हणजे अपघातास निमंत्रण असते. परंतु अल्प, तसेच किशोरवयीन मुले मात्र रहदारीच्या रस्त्यामधून दुचाकी सुसाट हाकत जात असतात. तसेच अनेक जण स्टंटबाजी करतानाही दिसून येतात. तरुणांची वाहन चालविण्याची पद्धत पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. पोलीस प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेलेले नसते. त्यात रस्त्यावर दुचाकी चालविण्याचा कमी अनुभव, पण मुलांच्या हट्टामुळे पालकवर्ग दुर्लक्ष करतात. त्यामुळे परवाना नसतानाही ते रस्त्याने वाहने चालवताना दिसून येतात. शनिवार, रविवार व सुटीच्या काळात अल्पवयीन मुले हमखास मोठ्या संख्येने दुचाकी चालवताना आढळतात. या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघणे हे जितके पालकवर्गाचे कर्तव्य आहे, तितकेच पोलीस प्रशासनाचे देखील आहे. शाळा, कॉलेज परिसरात मुख्य रस्त्यांवर यासाठी पोलिसांकडून काही कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. (वार्ताहर)वाहन चालविण्याचा हट्ट लहान मुले अनेक वेळा करतात आणि पालकही अशा हट्टाला बळी पडतात. ज्या वयात पूर्वी सायकल चालवायला मुले घाबरत असत, त्या वयाची मुले सुसाट वेगाने दुचाकी पळवताना, कट मारताना पाहवयास मिळत आहेत. अनेक वेळा सात-आठ वर्षांच्या मुलांना कौतुकाने पालकवर्ग दुचाकीचा हँडल पकडायला देतात. पुढे काय होईल, याचा विचार पालकवर्गच करीत नाही.अशा प्रकारे दुचाकी चालविणे जीवावर किती बेतू शकेल, याचा तिळमात्र विचार पालकवर्ग करीत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे भौतिक सोयी-सुविधांची वाढलेली ओढ अशा वागण्यास कारणीभूत ठरत आहे. हीच तरुणाई वाहन चालविताना मात्र हॉर्नचा वापर अतिशय कमी प्रमाणात करताना आढळते. दुचाकीच्या दोन्ही साइडचे आरसे म्हणजे यांना जणूकाही अडचणच वाटते. यावर वेळीच उपाययोजना हवी.
अल्पवयीन वाहनचालकांमुळे वाढले अपघात
By admin | Published: December 24, 2015 12:42 AM