लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन-चार महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना बिलांची रक्कम कमी करून दिली जाईल वा त्यांना परतावा दिला जाईल. वीज ग्राहकांना दिलासा देणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आणला जाणार आहे.
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची वीज बिले जून आणि जुलैमध्ये एकत्रितपणे देण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग, बिलांचे वाटपहोऊ शकले नाही. १ एप्रिलपासून नवे वीज दर लागू झाले. विजेचा वापर कमी करूनही बिले मात्र अव्वाच्या सव्वा आकारल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. वाढीव बिले कमी करण्यासंदर्भात वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दिला जाईल. आयोगाच्या अध्यक्षांशी झालेल्या चर्चेत हा निर्णय झाला. ९०% ग्राहकांना दिलासा मिळेल.
सवलतींसाठी स्लॅब!सूत्रांनी सांगितले की, वीज बिलाची रक्कम सरसकट कमी केली जाणार नाही. बिल एकत्रित भरणाऱ्या ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट आहे. बिलाचे बिनव्याजी तीन समान हप्ते पाडून देण्यात आले आहेत. तरीही वीज ग्राहकांमध्ये अन्यायाची भावना आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना त्याविरुद्ध आंदोलन करीत आहेत.