पुणे : मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असले, तरी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्लेसमेंटचा आकडा वाढताना दिसत नाही. राज्यभरात प्लेसमेंटचे सरासरी प्रमाण काही वर्षांपासून ३५ टक्क्यांच्या जवळपास आहे. मागील वर्षी त्यामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात भरमसाट वाढलेल्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या दर वर्षी हजारो जागा रिक्त राहतात. या तंत्रशाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत चालला आहे. मात्र, असे असले तरी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभियांत्रिकी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दर वर्षी वाढत आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून ही स्थिती समोर आली आहे. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असताना प्लेसमेंट म्हणजे संस्थेत शिकत असताना विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण मात्र स्थिर राहिले आहे. शैक्षणिक वर्ष २०१३-१४मध्ये एकूण १ लाख ९५ हजार ९१ विद्यार्थ्यांनी राज्यभरातील विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश निश्चित केला होता. त्यापैकी ८२ हजार ७४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील २९ हजार ५५७ विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरून प्लेसमेंट मिळाली. त्यापुढील वर्षी प्रवेशसंख्या कमी झाली, तरी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढून ८९ हजार ५२६ पर्यंत गेले. हे प्रमाण ७ हजारांनी वाढले असले, तरी प्लेसमेंटचे प्रमाण २ ते अडीच हजारांनी वाढल्याचे दिसते. मागील वर्षात हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
उत्तीर्ण वाढले, प्लेसमेंट वाढेना
By admin | Published: May 31, 2016 2:16 AM