मुंबई : मुंबईसह राज्यात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. कोविड पोर्टल नुसार मुंबईत आतापर्यंत ७.०१ लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
राज्याने आतापर्यंत १८ ते ५९ वयोगटातील ३,१२,१९२ बूस्टर डोस दिले होते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता बूस्टर डोस मोहिमेला गती मिळेल असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोनाचा विषाणू गेला या सामान्यांच्या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. शिवाय, शहरांमधील स्थलांतर ही वाढल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र आता संसर्ग वाढत आहे.
बूस्टर डोस कोणासाठी आवश्यक?- ज्या ६० वर्षांवरील व्यक्ती सहव्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या २२ व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. - आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे.- मात्र खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील. - ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे.
- या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. दरम्यान, मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे,असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.