मुंबई : गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते. हा आमच्यासाठी नवा अनुभव होता. कारण याआधी त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया कधीच मिळाल्या नव्हत्या, अशा शब्दात सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांचा मुलगा अभिषेकने आपल्या भावनांना वाट मोकळी केली. रविवारी दुपारी खेरवाडी स्मशानभुमीत शिर्र्केंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर घरी परतलेला अभिषेक बोलत होता. वाकोल्यातील कोले कल्याण पोलीस वसाहतीत राहाणाऱ्या शिर्र्कें पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. शिर्के मुळचे चिपुळणच्या कुटरे गावचे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. दोन्ही मुली पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहेत. मुलगा अभिषेक पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे शिर्र्केंच्या जाण्याने कुटुंबातला एकमेव कमावता हात नाहिसा झाला. त्यापेक्षा शिर्र्केंच्या अचानक जाण्याने त्यांचा परिवार सुन्न झाला. मी सहाय्यक फौजदर आहे. पण मला शिपायाची कामे दिली जातात. वयानुसार, आजारी पडल्यानंतर डॉक्टरने हलकी कामे द्यावीत, अशी सूचना केली होती. हे माहित असूनही हलकी कामे वाटयाला येत नव्हती, हे बाबा गेल्या दिड महिन्यांपासून सतत सांगत होते. त्याविरोधात त्यांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावरला जाच आणखी वाढला होता, अभिषेक सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी ते सुमारे दोन महिने रूग्णालयात होते. त्या काळात बाबा खरोखर आजारी होते. मात्र ही सुटी का घेतली याचा खुलासा करा, असा मेमो नुकताच त्यांच्या हाती पडला होता, असा दावाही अभिषेकने केला.काल दुपारी ते एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला हजर होते. भेटलेल्या प्रत्येक नातेवाईकाशी त्यांनी हसत खेळत गप्पा केल्या. नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी त्यांनी आठच्या सुमारास घर सोडले. मात्र पुढल्या अर्ध्या तासात त्यांच्या हातून असे काही घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांच्या दिवसभरातल्या वागण्यातून आली नाही, असे अभिषेकने सांगितले.शिर्के यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी पोलीस आणि मोठया संख्येने परिसरातील व्यावसायिक, फेरिवाले हजर होते. शिर्के शिघ्रकोपी असते, तापट असते तर त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी झाली असती का, असा सवाल नातेवाईकांनी केला. मुळात ते स्पष्टवक्ते होते. नियमांचे, कायद्याचे उल्लंघन त्यांना पटत नसे. त्यांचे हेच वागणे वरिष्ठ व अन्य सहकाऱ्यांना खुपत होते, अशाही प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.
वरिष्ठांविरोधी तक्रारी केल्याने वाढलेला जाच
By admin | Published: May 04, 2015 1:47 AM