मुंबई - मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून विधानसभेत सिल्लोड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तारांनी भूमिका बदलून शिवसेनेत प्रवेश केला. एवढच नाही तर शिवसेनेकडून निवडणूकही लढवली. परंतु, सत्तार यांच्यासाठी यावेळची निवडणूक काहीशी खडतर ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात चाललेला 'ट्रॅक्टर फॅक्टर' आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी सत्तारांचा घोर वाढवणारी ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सत्तार यांनी बंडखोरी करत भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. परंतु, सिल्लोडमधील भाजप नेत्यांच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांना शिवसेनेत पाठविण्याचे नियोजन केले. मात्र यामुळे शिवसैनिक काही प्रमाणात नाराज झाले. तर भाजप नेत्यांनी देखील सत्तार यांना रोखण्यासाठी ताकद पणाला लावली. त्याचवेळी काँग्रेसने याचा फायदा घेण्यासाठी प्रभाकर पलोदकर यांना दिलेले तिकीट बदलून मुस्लीम उमेदवार दिला. तर पालोदर अपक्ष रिंगणात उतरले.
शिवसेनेत एकाकी पडलेल्या सत्तारांना घेरण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले. त्यातच लोकसभा निवडणुकीत चाललेला ट्रॅक्टर फॅक्टर सिल्लोडमध्ये महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पालोदकर यांच्यामागे मराठा मतदार उभे राहण्याची शक्यता आहे. तर मुस्लीम मतदार सत्तारांना साथ देण्यावरून संभ्रमअवस्थेत आहे. ही बाब सत्तारांचे टेन्शन वाढवणारी आहे.
दरम्यान सिल्लोड मतदार संघाने यावेळी मतदानाच्या टक्केवारीत याआधीचे विक्रम मोडीत काढले आहे. मतदार संघात तब्बल 73 टक्के मतदान झाले. सत्तांतर होणार अशा वेळी नेहमीच मतदानाची टक्केवारी वाढते, असा समज आहे. तसं असेल तर ही सत्तारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याउलट वाढलेली टक्केवारी सत्तारांच्या पथ्यावर पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.