पुणे : यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना एकऐवजी चार वेळा मतदान करावे लागणार आहे; त्यामुळे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट जास्त वेळ लागेल. या पार्श्वभूमीवर, वाढीव मतदान केंद्र व कर्मचाऱ्यांची फौज महापालिकेला लागणार आहे. त्यासाठी शहरातील १,५०० शासकीय व निमशासकीय कार्यालयांना पत्र पाठवून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने नोंदविण्यात आली आहे.प्रभागरचना करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर पालिकेचा निवडणूक विभाग आता निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. महापालिकेची यंदाची निवडणूक पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाला नेहमीपेक्षा जास्तीची तयारी करावी लागत आहे. निवडणूक यशस्वी पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वीच ४ प्रभागीय पद्धतीनुसार एका मतदाराला मतदान करण्यासाठी किती वेळ लागू शकेल, याचा अहवाल सर्व महापालिकांकडून मागवून घेतला आहे.महापालिकेच्या वतीने १४ आॅक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे आणखीन नवीन मतदारांची भर पडणार आहे. मतदारांची संख्या, मतदानाला लागणारा वेळ या सगळ्या बाबींचा विचार करून मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये एका मतदारसंघात ३५० ते ४०० केंद्रे उभारण्यात आली होती. एका केंद्रासाठी ४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.महापालिकेच्या निवडणूक विभागाने सध्या १,५०० कार्यालयांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांची मागणी नोंदविली आहे. सर्व कार्यालयांमधून एकूण किती कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील, याची चाचपणी केली जात आहे. किमान २५ हजार कर्मचारी यासाठी लागू शकतील, असा सध्याचा अंदाज आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून २० टक्के राखीव कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येईल.मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मतदानाची वेळ वाढविण्याबाबत निवडणूक आयोगाकडून विचार केला जात आहे. निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.>मतदारांसाठी नावनोंदणी मोहीममहापालिका निवडणुकीसाठी १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदारांसाठी नावनोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.१ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना या यादीमध्ये स्वत:चे नाव समाविष्ट करता येईल. मतदारांना नाव आणि पत्त्यामध्ये बदल, नव्याने नाव समाविष्ट करणे, नाव वगळायचे असल्यास नजीकच्या मतदान नोंदणी केंद्रामध्ये जाऊन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
निवडणुकीसाठी वाढीव मतदान केंद्रे
By admin | Published: September 10, 2016 12:52 AM