नवी मुंबई : असह्य उकाड्यात शरीराची झीज भरून काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याबरोबरच फळांच्या माध्यमातूनही तहान भागविली जाते. याकरिता उन्हाळा सुरू होताच थंडगार कलिंगडांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आकाराने मोठ्या कलिंगडाऐवजी सध्या बाजारपेठेत आकाराने लहान, टिकाऊपणा, गोडवा आणि कमी किंमत यामुळे नॅनो कलिंगडाची मागणी वाढली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच कृषीक्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान वापरून प्रत्येक गोष्टीत ‘नॅनो‘ टेक्नोलॉजी विकसित करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे थंडगार आणि गोड कलिंगडाला बाजारात मागणी वाढू लागते. कलिंगडाचा आकार इतका मोठा असतो की, त्याची वाहतूक करणे अवघड होऊन बसते. गोल आकारामुळे हातात धरणेही कठीण होते. याची किंमतही शंभर रु पयांपेक्षा जास्त असते. याशिवाय फार काळ टिकत नाही, त्यामुळे बऱ्याचदा कलिंगड टाकून देण्याची वेळ येते. मोठे कलिंगड एक किलोपासून पाच किलो वजनाचे असते. याचा गोडवाही कमी असतो. बाजारात ‘शुगर बेबी’ नावाचे ‘नॅनो’ कलिंगड आले आहे. त्याचे वजन चारशे ग्रॅमपासून एक किलोपर्यंत असते. काळपट रंगाच्या या नॅनो कलिंगडाचे आवरण कठीण असते. आतला गर रवाळ असतो. वाहतुकीदरम्यान ते सहसा खराब होत नाही. त्याचा गोडवाही अधिक आहे. या कलिंगडाची विक्र ी डझनावर होते. नॅनो कलिंगडाची विक्र ी वजनावर होत असून वीस किलोचे प्लास्टिक पिशवीतील पॅकिंग उपलब्ध होत आहे. एका पिशवीत सहा ते सात कलिंगड असतात. त्याचा सरासरी दर सध्या साडेतीनशे रु पयांच्या आसपास आहे. एक नॅनो कलिंगड वीस ते पंचवीस रु पयांना मिळते. त्यामुळे ते परवडणारे आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातून कलिंगडाची आवक होते. पन्हाळा, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यातूनही कलिंगडाचे पीक घेतले जाते. कलिंगडाचे पीक अडीच महिन्यांत येणारे असल्याने उसात आंतरपीक म्हणून घेतले जाते. सध्या नॅनो कलिंगडाला चांगला भाव आला आहे. कलिंगडापाठोपाठ जंबो खरबुजाऐवजी नॅनो खरबूजही बाजारात येऊ लागले आहे. एक ते चार किलोऐवजी चारशे ते एक किलो वजनाचेही नॅनो खरबूज अधिक गोड आहेत. त्यात साखर घालण्याची गरज भासत नाही.
बाजारात नॅनो कलिंगडांना वाढती मागणी
By admin | Published: April 29, 2016 3:46 AM