विशाल शिर्के पुणे : साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. आरोग्यासाठी जागरुक व्यक्ती देखील साखर संपूर्ण सोडताना दिसत आहेत. मात्र, देशातील दरडोई साखरेचा खप सव्वा टक्क्यांनी वाढत असून, त्या तुलनेत मधुमेहाचे प्रमाण मात्र सव्वासहा टक्क्यांनी वाढत असल्याची आकडेवारी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. तसेच, साखरेमुळे नव्हे तर बदलत्या जीवनपद्धतीमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा केला आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार...! अशी म्हण एकेकाळी प्रसिद्ध होती. मात्र, कालांतराने साखरेचे खाणार त्याला रोग जडणार अशी भावना निर्माण झाली. वजन कमी करण्यासाठी साखरेला राम राम करणाऱ्यांची संख्या देखील अलिकडे वाढू लागली आहे. अनेक आहार तज्ज्ञ देखील पहिला सल्ला साखरेचे सेवन कमी करण्याचा देतात. मात्र गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास देशाचा दरडोई साखरेचा वार्षिक खप हा १८ ते १९ किलो दरम्यान आहे. ब्राझिलचा दरडोई वार्षिक खप सर्वाधिक ५२ किलो इतका आहे. देशातील मधुमेहाचे प्रमाण हे साखरेच्या खपापेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. देशात २००० साली ३ कोटी १० लाख ७० हजार मधुमेही होते. त्यात २०१६ पर्यंत ६ कोटी ३० लाखापर्यंत वाढ झाली. म्हणजेच या काळात मधुमेहींची संख्या दुप्पटीने वाढली. तर, २००० साली असणारा दरडोई साखर खप १५.३ किलोवरुन २०१६मधे १८.८ किलो पर्यंत वाढला आहे. साखरेचे सेवन हे मधुमेहाचे कारण नसल्याचे इस्माचे म्हणणे आहे. बदलती जीवनशैली व आहारामुळे लठ्ठपणा वाढत आहे. व्यायामाचा अभाव असल्याने मधुमेहींच्या संख्येत मोठी वाढ नोंदविल्याचे इस्माचे म्हणणे आहे. इस्माचे अविनाश वर्मा यांनी साखर खप आणि मधुमेहींची संख्या याचे व्यस्त प्रमाण दाखवून देत साखरेला मधुमेहासाठी पूर्णत: दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ---देशात सव्वासात कोटी मधुमेही देशात २० ते ७० वयोगटातील ८.८ टक्के व्यक्ती या मधुमेहग्रस्त आहेत. देशाची २०१६ अखेरची अंदाजित लोकसंख्या १३२ कोटी इतकी आहे. त्यातील ८२ कोटी ९४ लाख ९१ हजार लोकसंख्या २० ते ७० वयोगटातील आहे. त्या पैकी ७ कोटी २९ लाख ४६ हजार ४०० व्यक्ती मधुमेहाने बाधित आहेत.
साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 12:13 PM
साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. मात्र, साखर खपापेक्षा मधुमेह वाढीचा वेग दुप्पट आहे.
ठळक मुद्देदेशात २००० साली ३ कोटी १० लाख ७० हजार मधुमेही, त्यात २०१६ पर्यंत ६ कोटी ३० लाखापर्यंत वाढ