सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण येथे संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने मुंबईसह नवी मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याकरिता नवी मुंबईला १०४ किमीचा सागरी किनारा लाभलेला असून, त्याचीही गस्त वाढवण्यात आली आहे. याकरिता सागरी पोलिसांबरोबरच सीआरपीएफ यांच्यातर्फे बोटीने गस्त घालण्यात येत आहे.दहा महिन्यांपूर्वी उरण परिसरात काडतुसे असलेली पेटी आढळली होती. त्यानंतर गुरुवारी संशयित दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने उरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे संशयित दहशतवादी समुद्रामार्गे घुसल्याची शक्यता असल्याने गस्त घालण्यासाठी सागरी पोलिसांच्या सात बोटी किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडून शहराच्या संपूर्ण किनारपट्ट्या, जेट्टींचीही पाहणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यांनाही संशयास्पद काहीच आढळलेले नाही. याकामी पोलिसांच्या मदतीला सागरी सुरक्षा दल, मच्छीमार बांधवही धावून आलेले आहेत. त्यांच्याकडून देखील सागरी किनारी भागावर लक्ष ठेवले जात आहे. अनेक मच्छीमार बांधवांच्या बैठका घेवून त्यांच्याकडेही चौकशी करण्यात आलेली आहे. परंतु त्या दोन विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणीच संशयित दहशतवादी पाहिलेले नाहीत. शिवाय दोन दिवसांत पोलिसांनी संपूर्ण उरण शहर व लगतचा भाग पिंजून काढलेला आहे. जर दहशतवादी असते तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कोम्ब्ािंग आॅपरेशनमध्ये आढळून आले असते, अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे पोलिसांव्यतिरिक्त उरणमध्ये आलेली फौज परत पाठवण्यात आली असून आवश्यकता भासल्यास त्यांना बोलावले जाणार आहे.>उरणमध्ये संशयित दहशतवादी घुसल्याच्या शक्यतेवरून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सागरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी ७ बोटी कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जेट्टीच्या ठिकाणांची देखील देखरेख करण्यात येत आहे. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.