लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वायू आणि जलप्रदूषणाचा विळखा महाराष्ट्राला दिवसेंदिवस घट्ट आवळत असून, राज्यातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य सरासरी तीन वर्षांनी घटत चालल्याचे वास्तव आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक ही शहरे प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील बनली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार, वायुप्रदूषण एका विशिष्ट मर्यादेत रोखता आले तर महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात वाढ होऊ शकते; आणि ही वाढ मुंबई ३.५ वर्षे, ठाणे ३.४ वर्षे, पुणे ३.७ वर्षे, नागपूर ३.९ वर्षे आणि नाशिक २.८ वर्षे अशी असू शकते; मात्र जल व वायुप्रदूषणामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे.
दरवर्षी दोन दशलक्ष टन कोळशाची राख मुंबई महानगर प्रदेशातील कारखान्यांत दरवर्षी दोन दशलक्ष टन कोळसा जाळला जातो. मुंबईनजीक १३ औद्योगिक क्षेत्रांपैकी ट्रान्स-ठाणे खाडी, तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली या क्षेत्रात ७० टक्के कार्यरत उद्योगांचा समावेश आहे. हे उद्योग प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.प्रदूषणाचे स्रोत : उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण.हवेची गुणवत्ता ६० इतकी म्हणजेच हवेतील पीएम २.५ चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा कमी असावे लागते.