लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीएसटीच्या निमित्ताने सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा उफाळून आली होती. त्यानंतर, आता मुंबईतील ‘कल्चर मीडिया’ कंपनीने पीरियड लिव्हला मान्यता दिल्यानंतर, याप्रमाणे सर्व स्तरांवर ही रजा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याविषयी आॅनलाइन याचिकाही सुरू करण्यात आली असून, अवघ्या काही दिवसांत याला तब्बल २७ हजार ९०९ जणांनी पाठिंबा दर्शविला आहे.‘कल्चर मीडिया’च्या या पीरियड लिव्हला मंजुरी दिल्यानंतर, शिवसेनेच्या नगरसेविकेनेही अशा मागणीचे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे शासकीय, अशासकीय सर्व स्तरांतून याविषयी जोरदार चर्चा होताना दिसतेय. ‘कल्चर मीडिया’ या कंपनीने मागणीचे निवेदन केंद्रीय महिला व बालविकास विभाग आणि केंद्रीय मनुष्य बळ विकास यांनाही पाठविले आहे. ‘कल्चर मीडिया’ या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचे नवे धोरण या कंपनीने गेल्या १ जुलैपासून सुरू केले आहे.दक्षिण कोरिया, तैवान आणि इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत, त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. परदेशातील अनेक कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये ‘पीरियड लिव्ह’ देण्याची पद्धत आता रुजत आहे, पण भारतात पीरियड लिव्ह देण्याची तशी पद्धत नाही. आॅनलाइन याचिकेनंतर आता फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅप या अन्य सोशल मीडियाच्या व्यासपाठीवरही याविषयी खुलेपणाने चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे, विविध विद्यापीठ संस्थांमधील विद्यार्थिनी या विषयाच्या जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविताना दिसत आहेत.
‘पीरियड लिव्ह’च्या याचिकेला वाढता पाठिंबा
By admin | Published: July 17, 2017 1:37 AM