मुंबई : परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली ४ हजार ८४९ कोटींची वाढ फसवी आहे. रावते यांनी दिलेल्या सूत्रानुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला फक्त ३ हजार २१६ रुपये इतकी किमान वेतनवाढ मिळेल, असा दावा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला. वेतनवाढ फसवी असल्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी मंत्री रावते यांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितले.मान्यताप्राप्त संघटनेला मंगळवारी प्रस्ताव पाठवण्यात आला. रावते यांनी एकूण ४ हजार ८४९ कोटींची वाढ केल्याचे स्पष्ट केले. यानुसार दरवर्षी १२१२.२५ कोटी इतकी वाढ होते. मात्र सूत्रानुसार प्रत्यक्षात होणारी वाढ यात फरक आहे. ज्यांना वेतनवाढ मान्य नाही त्यांनी राजीनामा देत कंत्राटी पद्धतीने रुजू होत दरवर्षी २०० रुपये वाढ घ्यावी, अशी अप्रत्यक्ष धमकी मंत्री रावते यांनी दिली आहे. वेतनवाढ ऐतिहासिक असेल तर अशी धमकी का दिली, असा संघटनेचा सवाल आहे.नियमित वेतनश्रेणी कर्मचाºयांना किमान वाढ ४ हजार ६१९ ऐवजी ३ हजार २१६ रुपये तर कमाल वाढ १२ हजार ७१ ऐवजी ६७३३ इतकी मिळेल. कनिष्ठ श्रेणी कर्मचाºयांना किमान वाढ ४ हजार ६१९ ऐवजी ३ हजार ४३० रुपये व कमाल वाढ ९ हजार १०५ ऐवजी ६ हजार १९६ रुपये मिळेल. ३२ ते ४८ टक्के वेतनवाढीचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात मात्र १७ ते २५ टक्के वाढ दिल्याचा संघटनेचा आरोप आहे.
वेतनवाढ फसवी; महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:42 AM