मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेचा (पीएमसी) अध्यक्ष आणि एचडीआयएलचा माजी संचालक वरियम सिंग कर्तार सिंग याच्यासह एचडीआयएलचा संचालक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या तिघांच्या पोलीस कोठडीत सोमवारी १६ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली.
तिघांनाही सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी कोर्टाबाहेरच पीएमसी बँक खातेदारांनी निदर्शने करत, ‘नो बेल ओन्ली जेल,’ ‘वोट फॉर नोटा’चा नारा देत, आम्हाला आमचे पैसे लवकरात लवकर द्या आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी मागणी केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैसे परत मिळतील, याबाबत लेखी आश्वासन द्यावे, असे मतही व्यक्त केले.वाधवाच्या वकिलांनी युक्तिवाद करत, आतापर्यंतच्या तपासाबाबत विचारणा केली. तिघेही पोलीस तपासात सहकार्य करत असल्याचेही सांगितले. तर, आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, तपासात प्रत्येक दिवशी नवीन माहिती हाती लागत आहे. पीएमसी बँकेचा निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या पुण्यातील आणखी ९ मालमत्तांचा शोध पोलीस तपासात लागला आहे. याबाबतही चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी गुन्हे शाखेने केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांच्याही कोठडीत १६ तारखेपर्यंत वाढ केली.
घोटाळ्यातील ९० कोटी बँक आॅफ इंडियातवरियम सिंगने एचडीआयएलच्या विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो या घोटाळ्यात दुहेरी भूमिका बजावत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर येत आहे. एचडीआयएलला घोटाळ्याबाबत सांगून त्याने कर्ज मंजूर करून घेतल्याचा संशय आहे. या घोटाळ्यादरम्यान सिंग कुटुंबाचे अनेक व्यवसायही जोरात होते. वाधवा पिता-पुत्राने बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी ९० कोटी बँक आॅफ इंडियाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचेही समोर आले आहे. वाधवाचे चालू खाते पीएमसीत असताना त्याने, फसवणुकीच्या उद्देशाने कर्ज खाते नव्याने उघडल्याचा अंदाज असून याबाबतही तपास सुरू आहे.