मुंबई : गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले़पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिव चित्रकला सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ गाय व बैल यांचा शेतीसाठी वापर केला जातो़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या गोधनाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गायीपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका ही केवळ गोमांस खाण्यास मुभा मिळण्यासाठी करण्यात आली आहे़ यासाठी गोमांस परराज्यातून आणण्यास परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे़ या बंदीने राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)
गोधनामुळे उत्पन्न वाढते
By admin | Published: April 21, 2015 1:03 AM