राहुल गांधींवरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 06:08 AM2023-03-24T06:08:00+5:302023-03-24T06:08:25+5:30
सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे आमदार वेलमध्ये उतरून एकमेकांच्या नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, या मागणीवरून सत्तापक्षाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोन वेळा तहकूब करण्यात आले.
शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांनी हा विषय उपस्थित केला. शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांना साथ देत असल्याबद्दल ठाकरे गटाचा निषेध व्यक्त केला. भाजपचे आशिष शेलार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना चपलेने मारायला हवे, असे जाहीर केले होते. त्याउलट त्यांचे वारस आज राहुल गांधींना साथ देत आहेत, अशी टीका केली.
यावेळी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे आमदार वेलमध्ये उतरून एकमेकांच्या नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.. गदारोळात कामकाज आधी दहा मिनिटे आणि नंतर अर्ध्या तासासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपचे अतुल भातखळकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनला जाऊन ब्रिटिशांच्या छाताडावर पाय ठेवून क्रांतिकार्य केले आणि तुरुंगातून जामिनावर असलेले राहुल गांधी त्यांच्यावर टीका करतात, त्यांचा निषेध करतो,’ असे वक्तव्य केले. त्याला आक्षेप घेऊन कॉँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी भातखळकर यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली.
गदारोळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सावरकरांनी जे भोगले ते कोणीही भोगलेले नाही. अनन्वित अत्याचार सहन करत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. क्रांतिकारक भगतसिंगांनीदेखील सावरकरांनी तयार केलेले जोसेफ मॅझिनीचे चरित्र बाळगले होते, वाचले होते तर मग हे लोक काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का, त्यांचा आम्ही निषेध करतो.’
विधानभवनात जोडे मारो आंदोलन न करण्यावर एकमत
सत्तापक्षाच्या आमदारांनी खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोडे मारो आंदोलन केले, याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला. राज्याच्या विधानमंडळाच्या परंपरेला हे शोभणारे नाही. असे अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याबाबत घडू शकते. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून निर्देश द्या, अशी मागणी पवार यांनी अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले की, सभागृहाच्या आवारात जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही, असे मी सत्तारूढ पक्षाच्या वतीने आश्वस्त करतो. स्वातंत्र्यवीरांच्या संदर्भात वेडेवाकडे बोलणे ही हीन प्रवृत्ती आहे, असेही ते म्हणाले. विधिमंडळाच्या आवारात असंसदीय काम होणार नाही, याची काळजी घ्या नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले. राहुल गांधींच्या निषेधासंदर्भात योग्य आयुधाचा वापर सत्तापक्षाने करायला हवा होता, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.