मुंबई - टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला लोळवत विजय मिळवला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीनंतर, विराट आणि पांड्या यांची शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
अविस्मरणीय विजय -"पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा," असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
विराट कोहलीनं फक्त 10 चेंडूत ठोकल्या 48 धावा -या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलदाज विराट कोहलीने (Virat Kohli) धडाकेबाज अर्धशतक ठोकत इतिहास रचला. कोहलीने 53 चेंडूंचा सामना करत एकूण सहा चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत कोहलीने 48 धावा तर फक्त 10 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच केल्या. हे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील कोहलीचे 11वे अर्धशतक ठरले.
याच बरोबर, टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट कोहलीने आता रोहित शर्मा मागे टाकले आहे. आजच्या सामन्यानंतर आता त्याच्या 3794 धावा झाल्या आहेत. तर रोहितच्या नावार 3741 टी-20 इंटरनॅशनल धावांची नोंद आहे.