शिवस्वराज्य यात्रेमुळं हर्षवर्धन पाटलांच्या आशा पल्लवित; भरणेंचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:19 PM2019-08-28T16:19:28+5:302019-08-28T16:19:40+5:30
इंदापूरच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी कायम मानली जात आहे. परंतु, अजुनही काही जागांवर उभय पक्षात एकमत होत नसल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या जागेवरून देखील दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे पाटील यांनी सुटकेचा श्वास सोडला असेल तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन वाढलं आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरात यात्रा काढण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजपने महाजनादेश आणि शिवसेनेने जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रा काढली. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वीच ही यात्रा पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये दाखल झाली होती. मात्र या यात्रेकडे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे हर्षवर्धन पाटील अजुनही या जागेसाठी आशावादी आहेत. तर भरणे यांचं टेन्शन वाढलं आहे.
२०१४ मध्ये इंदापूरमधून राष्ट्रवादीचे भरणे विजयी झाले होते. त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. आता या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत आहे. विजयी जागांवर त्या पक्षाचा दावा असं ठरलेलं आहे. परंतु, काँग्रेसकडून या जागेसाठी आग्रह धरण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यातच राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात आली होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार, सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. यावरून राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्यास सकारात्मक असल्याचे मॅसेज कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. त्यामुळेच भरणे यांचं टेन्शन वाढल आहे.
दुसरीकडे इंदापूरच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मदत केली होती. पाटील यांच्यामुळे सुळे यांना इंदापूरमधून आघाडी मिळाली होती. त्याचीच परफेड राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळेच शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये आली असताना दिग्गज नेते गैरहजर होते, अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे. यामुळे भरणे यांचे टेन्शन वाढले आहे. तर हर्षवर्धन पाटील काही प्रमाणात का होईना निश्चित झाले आहेत.