पुणे : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा विहित नियमानुसार नसल्याने अवैध ठरण्याची शक्यता आहे.
मराठा, धनगर, लिंगायत,अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासन लेखी तोंडी आश्वासन देत आहे. ठोस भूमिका घेत नाही. अशा परिस्थितीत सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून पदावर रहाण्यात आपल्याला नैतिकता वाटत नाही, म्हणून आपण आमदार पदाचा राजीनामा देत आहोत, अशी घोषणा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी गुरूवारी (दि.२५) रोजी सायंकाळी मराठा मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी केली. तासाभरात विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवण्याचा शब्द आंदोलकांना देवून, त्यानुसार तसे पत्र त्यांनी फॅक्सद्वारे बागडे यांच्याकडे पाठवून दिले. मात्र राजीनामा दोन ओळीत आणि कोणत्याही करणाविना देणे बंधनकारक आहे. तसेच हा राजीनामा स्वतः अध्यक्षांकडे देणे बंधनकारक आहे.मात्र भरणे यांच्या राजीनाम्यात हे निकष पाळण्यात आलेले नाहीत.
याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यातील मराठा समाजाबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला भाजप सरकारने आरक्षण देण्याचे वेळोवेळी अश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चारही समाजाच्या हाती काहीच आले नाही. त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र होत असून, वेळीच दखल घेतली नाही तर समाजात आगडोंब उसळण्याचा धोका आहे. सरकारने लोकभावनेची दखल घेऊन दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावी, या मागणीसाठी मी माझ्या इंदापूर विधानसभा मतदार संघातील आमदारकीचा राजीनामा देत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.आजचा राजीनामा विहित नियमानुसार नसला तरी सोमवारी स्वतः अध्यक्षांकडे जाऊन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.