लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सरसकट कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यात पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा निर्धार सुकाणू समितीने केला आहे. १४ आॅगस्टला राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी चक्का जाम करून मंत्र्यांना अडविले जाणार आहे.अधिवेशनातही संपूर्ण कर्जमाफीचा ठराव मांडला जाईल. मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चालाही समितीने पाठिंबा दिला असून सर्व शेतकरी संघटना त्यात सहभागी होणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले.राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याच्या विरोधात शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी समितीने १० जुलैपासून राज्यात जनजागरण यात्रा काढण्यात आली होती. त्याची सांगता सभा रविवारी पुण्यातील मार्केटयार्ड आवारात झाली. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. आ. जयंत पाटील, आ. बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे यांच्यासह समितीतील इतर सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, अधिवेशनात कर्जमाफी झाल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही. पहिल्याच दिवशी संपूर्ण कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या मागणीचा ठराव मांडला जाईल. ठरावाच्या बाजूने किती आमदार उभे राहतात, हे दिसेल. हा ठराव ऐतिहासिक असेल. ...अन्यथा घरात घुसून आंदोलनपालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्यात अयशस्वी ठरल्यास त्यांच्या घरात घुसून आंदोलन केले जाईल, असा इशारा कडू यांनी दिला. पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांऐवजी ग्रामसेवक, जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करण्याचा आग्रह धरला जाईल, असेही ते म्हणाले.समिती एकसंध, मतभेद नाहीतमतभेद कितीही झाले तरी समिती एकसंध आहे. समितीतील एकही सदस्य बाहेर पडणार नाही. रघुनाथ पाटील यांनी सदाभाऊ खोत यांना उद्देशून बेईमान म्हटले होते. त्याचा विपर्यास करण्यात आला. राजू शेट्टी व रघुनाथदादा एकमेकांशी आदराने बोलतात. सर्व एक आहेत, कोणतेही मतभेद नाहीत, असे आ. पाटील म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:31 AM