स्वातंत्र्य... खरंतर 15 ऑगस्टची प्रकर्षाने आठवण करून देणारा एक शब्द. स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? असं विचारल्यावर स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदी, मजा, मस्ती आणि फक्त धमाल, बायकोपासून सुटका, गर्लफ्रेंडचे नखरे नाही, बॉयफ्रेंडची कटकट नाही, मर्यादा नाहीत, बॉससोबत थेट भिडणं, घरबसल्या आरामात काम आणि सुट्टी अशी सोयीची उत्तरं हमखास मिळतात. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्' मधला फरक माहीत नसलेले राष्ट्रभक्तीचे गोडवे गातात तर कधी Independence Day आणि Republic Day म्हणजे नेमकं काय विचारल्यावर गोंधळणारे महाभागही इथेच भेटतात. स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळीच असते.
केवळ एका दिवसासाठी राष्ट्रभक्ती उफाळून येते, स्वातंत्र्याचा उमाळा येतो, राष्ट्रप्रेमाचा तर अक्षरशः पूर. यत्र तत्र सर्वत्र 'तिरंगा'. पांढऱ्या रंगाचे कपडे तर त्या दिवसाचं खास आकर्षण. 15 ऑगस्टची सुट्टी वाया जाऊ नये यासाठी आदल्या दिवशी साजरा करणारेही इथलेच. सामाजिक भान, कर्तव्य विसरून प्रत्येक गोष्टीत फक्त प्रशासनाला धारेवर धरणारे तसेच स्वत: च्या चुकांवर पांघरून घालून स्वातंत्र्यावर गमजा मारणारेही बरेच भेटतात. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला नेमका फरक समजणं काळाजी गरज आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय वाटतं?,खरंच स्वातंत्र्य आहे का? यावर तरुणाईशी साधलेला संवाद...
स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. मात्र अजूनही अनेक लोक स्वातंत्र्यापासून दूर असल्याचं दिसून येतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच ज्यांची परिस्थिती बिकट असते किंवा जे लोक अशिक्षित असतात त्यांना तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर दूरची गोष्ट, स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याची देखील पूर्णपणे कल्पना नसते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा अशा व्यक्तींना कशा पद्धतीने होईल याचा विचार केला तर देश खरंच प्रगतीपथावर वाटचाल करेल आणि स्वातंत्र्य हा शब्द खऱ्या अर्थाने समजण्यास मदत होईल.
- मुकेश चव्हाण
स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताने प्रत्येक क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे. पण मिळालेल्या स्वातंत्र्याचा नेमका अर्थ देखील कळणं गरजेचं आहे. फक्त एका दिवसासाठी मीडियावर पोस्ट करण्यापुरतं देश प्रेम न राहता देशाबद्दल आदर आणि प्रेम हे निरंतर राहणं गरजेचं आहे. एका पोस्टच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला जर कोणत्याही पद्धतीने देशासाठी काहीही करण्याची संधी मिळाली तर जरूर त्याचा योग्य वापर करावा आणि स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्या मागचा भारत समजून घ्यावा.
- निधी पेडणेकर
स्वातंत्र्य हा शब्द ऐकल्यावर आपल्याला 15 ऑगस्टची आठवण येते कारण या दिवशी भारत देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. भारतीयांना हक्क मिळाले. पण तसं म्हणायला गेलं तर आज अनेक स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. आजही अनेक भागांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार होतात. लहान मुलींपासून ते वयोवृद्ध स्त्रियांवर देखील बलात्कार होताना दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशभरात स्त्रियांवरती अत्याचार होतात. त्या स्त्रिया आहेत का स्वातंत्र्यात हा प्रश्नच आहे.
- श्रुती जाधव
आज आपण 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 2019 मध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधील 'कलम 370' रद्द केल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असं म्हणता येईल. पण दुसरीकडे सांगली-कोल्हापुरात महापुराने जनजीवन, संसार उद्ध्वस्त झाले असल्याने त्यांना मदतीचा हात देऊन आपल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून घेण्याची आता वेळ आली आहे.
- नितीन कुऱ्हे
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण नेहमी भारत माझा देश आहे असं म्हणतो पण इतर दिवशी नियम तोडून ही गोष्ट सर्रास विसरतो. फक्त एका दिवसासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक किंवा सोशल मीडियावर देशप्रेम दाखवण्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे देखील भान ठेवणं गरजेचं आहे.
- आरती उतेकर
देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे पण देशातील महिलांना नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री उभी आहे. परंतु तिला अनेक ठिकाणी तू एक महिला आहेस म्हणून अशी राहा, तू हे करू नकोस असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मग महिलांना स्वातंत्र्य कसं काय? त्यामुळे मला असं वाटतं की देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण महिलांना अद्याप नाही.
- समिक्षा राऊत