मुंबई : बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र मॉल उभे करण्याचा शासनाचा मानस असल्याचे ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. वांद्रे येथील रेक्लेमेशन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘सरस’ महालक्ष्मी या महिला बचत गटांतर्फे उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात नागपूर आणि औरंगाबाद येथे बचत गट मॉल सुरू करण्यात येतील. याशिवाय खासगी मॉलमध्ये अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा राखीव ठेवणे अनिवार्य केले जाईल.मुंडे या वेळी म्हणाल्या की, बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्यासाठी शासनाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना १४व्या वित्त आयोगाचा मोठा निधी उपलब्ध होणार असून, या निधीच्या माध्यमातून ‘मेक इन व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण अशा १० वस्तूंची निवड करून बाजारपेठ मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केला जाईल, असेही पंकजा मुंडे यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बचत गटांच्या मालासाठी स्वतंत्र मॉल
By admin | Published: January 25, 2016 2:35 AM