आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे अपक्षांसह छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होताना दिसत आहेत. यातच भाजपला मतदान करता येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी माझ्या अटकेचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.
रवी राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडिओतून हा आरोप केला आहे. आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. हे वॉरंट आमदार राणा यांना देण्यासाठी राजापेठ पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील घरी पोहचले होते. पण राणा दाम्पत्य तेथे नसल्याचे समोर आले. यानंतर रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर मोठे आरोप केले.
भाजपला मतदान करता येऊ नये म्हणून अटकेचा प्रयत्न
राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. राणा दाम्पत्य आताच्या घडीला राजस्थान दौऱ्यावर असल्याचे समजते.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आमदार राणा यांना त्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. हाच अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.