Maharashtra Politics: शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर टीका होत असताना, अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे गट आणि संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर गंभीर आरोप केला आहे. यावर बोलताना रवी राणा म्हणाले की, संजय राऊत हे वैतागलेले आहेत. यावर पुढे जास्त काही बोलणार नाही. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंबरोबर गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.
आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल
मीडियाशी बोलताना रवी राणा पुढे म्हणाले की, बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निकाल दिला. बहुमतावर आमदार, खासदार बनतात. बहुमतावरच सरकार बनते. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचे ९५ टक्के बहुमत आहे. त्यामुळे त्यांना धनुष्यबाण मिळाला आहे. उद्या त्यांना शिवसेना भवन मिळेल. तसेच महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, कारण तिथे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत, असे रवी राणा यांनी सांगितले.
दरम्यान, खोक्यांचा आरोप करणारे आणि नेहमी नामर्द म्हणणाऱ्या संजय राऊतांना माझा प्रश्न आहे, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे आदेश दिले. तेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवाजी महाराजांचे पुतळे काढले. तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते, या शब्दांत रवी राणा यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"