Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच अलीकडेच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत बाजी मारत आमदार झालेले सत्यजित तांबे यांनी भरसभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. सत्यजित तांबे यांनी पक्षादेशाच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले होते. यानंतर आता एका सभेत बोलताना माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे, असे म्हटले आहे.
माझा यशाचा एकच बाप आहे
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केले आहे. ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच चोपडा तालुक्यात आले असताना बोलत होते. अनेक लोक येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचे खरे श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे. हे मी सभागृहातही मांडले. इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स’. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले.
दरम्यान, त्यांनी मागील १४-१५ वर्षात प्रत्येकाशी जे संबंध निर्माण केले त्यामुळे मी निवडून आलो. त्यांनी कधीच कुणाची जात पाहिली नाही किंवा धर्म पाहिला नाही, कुणाचा पक्ष पाहिला नाही. त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले म्हणून सर्वजण माझे पाठीशी उभे राहिले. याची मला जाणीव आहे, असे सांगत बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे, असे सूचक वक्तव्य सत्यजित तांबेंनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"