आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:41 PM2019-11-05T15:41:16+5:302019-11-05T15:41:36+5:30
ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची देखील गोची झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. तर 15 हून अधिक अपक्ष निवडून आले. या अपक्ष आमदारांनी सोईस्कर आणि सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपक्षांनी भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात युतीचं सरकार येईल या आशेवर अपक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला. मात्र आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार हे सांगणे कठीण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे या अपक्षांसमोर आधीच पाठिंबा जाहीर केलेल्या भाजपसोबत राहायचं की, सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांसोबत जायचं असा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता भूमिका बदलली आहे. ते करमाळ्यातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहे. ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे.