Maharashtra Politics: आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होत असताना, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकत त्यांनी मिळवली असती, असा टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरून नेला. बाप चोरून नेला नाही तर तुम्ही ज्या बापाचे विचार बाजूला ठेवले ते विचार पुढे नेण्याचे काम शिंदे गट करत असल्याची बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत, तर हिंदुत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी करतील असा दावा राणा यांनी केला.
उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत
उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व आहे असे वाटत नाही. बाळासाहेबांनी जे मिळवले, त्याच्या दहा टक्केही उद्धव ठाकरे यांना मिळवता आले नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
दरम्यान, नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचे स्वत:वर नियंत्रण राहिले नाही. त्यांनी स्वत:ला सांभाळले पाहिजे. कार्यकर्त्यांना मारणे हा कार्यकर्तांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी ठेवायला हवा असे नवनीत राणा म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"