मुंबई - सत्तेसमोर सर्वकाही शून्य असं समिकरणच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारवरून स्पष्ट झाले आहे. भाजप सत्तेवर येणार या विचाराने अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेकनेते भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आणि भाजपसोबत राहिले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अपक्षांना सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजयमामा शिंदे यांनी भाजप सत्तास्थापन हे दिसताच आपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्यावेळी सर्वांना आश्चर्य व्यक्त केले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, संजयमामा यांनी निर्णय बदलत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला. मतदार संघातील कामं करायची तर सत्तेसोबत जाणे आवश्यक आहे. या विचाराने भाजपसोबत गेलेले आमदार महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे.
संजयमामा यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बहुमताच्या वेळी राजेंद्र राऊत हे गैरजहर होते. त्यामुळे ते भाजपमध्येच जाणार हे स्पष्ट झाले होते. मात्र पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आणि त्यामुळे मतदार संघातील कामं होणार नाही, या उद्देशाने राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदेही असल्याचे सांगण्यात जाते.
दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते.