मुंबई - देशभरात 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. 'पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच' अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच निर्बंध पाळावेत नाहीतर लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा लावावा लागू शकतो असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
"गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट (Corona Virus) आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. 16 ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा आलं आहे. आपल्याकडे ते येऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"कोरोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्याने साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला" असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच "आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश कोरोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणार ही प्रतिज्ञा आपण करुयात" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार"; मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास (Happy independence day 2021) सुरुवात केली आहे. 'हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल' असं म्हणत मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान एक मोठी घोषणा केली आहे. "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार" असल्याचं म्हटलं आहे.
"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना 75 वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार" असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. "देशातील लहान शेतकरी हा देशाची शान ठरावा हे आमचे स्वप्न आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये देसातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला अधिक वाढवावे लागेल. त्यांना अधिक सुविधा द्याव्या लागतील. भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. 100 लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल" असं ही म्हटलं आहे.