काँग्रेस नेते राहुल गांधी मागील काही दिवसांपासून भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात फिरत आहेत. काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत 'इंडिया' आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काल त्यांनी चैत्य भूमीला भेट दिली. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, ६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे. आज रविवार १७ मार्च रोजी सभेचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.
उद्धव ठाकरे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. याचाच दाखला देत शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. अलीकडेच देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील देण्यात आली.
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, आज रात्री शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत. त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..., सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील... मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..., आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो..., ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.