मुंबई - एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, असं ट्वीट करुन औवेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. भारत देशाची ओळख हिंदूराष्ट्र अशी करुन तुम्ही माझ्या देशाचा इतिहास मिटवू शकत नाहीत, असे औवेसींनी म्हटलं आहे.
भागवतांची खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आपल संस्कृती, पंथ, श्रद्धा आणि वैयक्तिक ओळखही हिंदू धर्माशी जोडलेली आहे, असा आग्रह ते आम्हाला करू शकत नाहीत. भारत देश कधीही हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि ना कधीच बनणार... असे ट्विट औवेसींनी केलंय. आपला देश हिंदूंचा आहे, आपल राष्ट्र हिंदू राष्ट्र असून हिंदू हे कुठल्याही पुजेचं नाव नाही, कुठल्या भाषेचं किंवा प्रदेशाचं नाव नाही. हिंदू ही एक संस्कृती असून भारतात राहणाऱ्या सर्वांचाच सांस्कृतिक वारसा आहे, असे मोहन भागवत यांनी एका सभेत बोलताना म्हटले होते. त्यावर, असुदुद्दीन औवेसींनी भागवतांवर टीका केली आहे. तसेच मोहन भागवतांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्याने काही फरक पडत नाही. भागवत आम्हाला परदेशी मुस्लीसांसोबत जोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात. असे प्रयत्न केल्यामुळे माझ्या भारतीयत्वावर काही परिणाम होणार नाही. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून असदुद्दीन औवेसींच्या महाराष्ट्रात सभा सुरू आहेत.