ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - रक्त शरीरातील महत्वाचा घटक असून रक्त दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात. रक्तदान पुण्यकर्म असल्याने नागरीकही शिबिरांमध्ये जाऊन मोठया संख्येने रक्तदान करतात. पण जमा होणारे रक्त साठवण्याची व्यवस्थाच अपुरी असल्यामुळे मोठया प्रमाणावर रक्त वाया जात आहे. रक्त साठवण्याच्या सुविधेअभावी मागच्या पाचवर्षात देशभरातील विविध ब्लड बँक्सना रक्ताचे 28 लाख युनिटस फेकून द्यावे लागले आहेत.
चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली. रक्त साठवण्याच्या व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी यानिमित्ताने समोर आल्या आहेत. लिटरमध्ये मोजायचे झाल्यास पाचवर्षात 6 लाख लिटर रक्त फेकून द्यावे लागले असून, पाण्याच्या 53 टँकर इतके हे प्रमाण आहे.
देशभरात इतक्या मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही भारतात वर्षाला सरासरी रक्ताच्या 30 लाख युनिटसची कमतरता भासते. रक्त, प्लासमा, प्लेटलेटसच्या कमतरतेमुळे प्रसुती तसेच अपघातानंतर होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणइ तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रक्त फेकून द्यावे लागते. रक्तबरोबर प्लासमा, लाल रक्तपेशी सुद्धा वाया जातात.
प्लासमा, लाल रक्तपेशी हे आयुष्य वाचवणारे घटक आहेत. पण मुदतीआधी त्यांचा वापर करता येत नाही. 2016-17 मध्ये रक्ताचे 6.57 लाख युनिटस फेकून द्यावे लागले. महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे जिथे वर्षाला 10 लाख युनिटसपेक्षा जास्त रक्त जमा होते. पण रक्त संचयाच्या सुविधेअभावी महाराष्ट्रातच सर्वात जास्त रक्त वाया जाते. ब्लड बँक आणि रुग्णालयांमध्ये ताळमेळ नसल्याने गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही तसेच रक्तदान शिबिरांचा स्थानिक
राजकारणी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करतात. रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर झरीन भरुचा यांनी सांगितले की, 500 युनिटसपर्यंत रक्त जमा करा पण शिबिरांमध्ये 1 हजार ते 3 हजार युनिट रक्तजमा होते. पण इतके रक्त साठवण्याची व्यवस्था कुठे आहे ? त्यामुळे मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही गरजेच्यावेळी नागरीकांना रक्त तर उपलब्ध होत नाहीच पण लाखो लिटर रक्तही फेकून द्यावे लागत आहे.