मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपाचा पराभव करून देशात परिवर्तन आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. त्यासाठी बिहारच्या पाटणा, कर्नाटकच्या बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीचं आयोजन ठाकरे गटाकडून केले जात आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीचे संयोजक पक्षप्रमुखांना बनवू नये असा सूर ठाकरे गटाच्या बैठकीत निघाला.
मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुखांनी संयोजकपद स्वीकारू नये अशी कुठलीही अधिकृत माहिती अथवा निर्णय झाला नाही. मुंबईच्या बैठकीत संयोजकपदाबाबत निर्णय होणार आहे. २६ पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत येत आहे. मुंबईच्या बैठकीत सर्व गोष्टीचा विचार होईल. त्यानंतर सर्वांना विचारात घेऊन एकमत होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच विरोधात पहिली फळी, दुसरी फळी असे काही नाही. सगळे प्रमुख नेते आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल हे सगळे आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत. उद्याच्या निवडणुकीत हे सगळे आपल्या पक्षाच्या प्रचारात अडकले असतील. संयोजकपद हे निरोप देणे-घेणे एवढ्यापुरते मर्यादीत नाही. एनडीएचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस असतील आम्ही त्यांच्या कामाचा आवाका पाहिला आहे. इतक्या पक्षांना एकत्र ठेवणे, सांभाळणे, विविध विचारांचे पक्ष आहेत त्यांना एकत्र आणणे हे सोपे काम नसते. त्यामुळे ज्याच्यावर पक्षाची जबाबदारी नाही. तो पूर्णवेळ काम करू शकेल असा नेता यापदासाठी हवा असं आमचे मत आहे. त्याच्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा होईल त्यावर निर्णय घेतला जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यात स्पर्धा नाही. आधी एकत्रित निवडणूक लढणे गरजेचे आहे. कुठलेही मतभेद असता कामा नये हे सगळ्यांचे मत आहे. संयोजक हा तांत्रिक भाग आहे. ३ बैठका झाल्या कोण संयोजक आहे कुणी नाही. प्रत्येक पक्ष आम्हाला जबाबदारी द्या असं म्हणत पुढे येतोय. सर्वांना सामावून घेऊन पुढे चाललोय. अहंकार बाजूला ठेऊन आम्ही पुढे आलोय. नेत्यांच्या मनात कुठलीही अहंकाराची भावना नाही. कदाचित संयोजकपदाची गरज भासणार नाही. सामुहिक निमंत्रक नेमले जातील. परंतु हे माझे मत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले. मुंबईत ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे.