विशेष प्रतिनिधी मुंबई : इतर देशांना उद्ध्वस्त करणार नाही, अशी महासत्ता बनतानाच भारताने विश्वाचे मित्र बनून जगाचे नेतृत्व करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. देशांची श्रीमंती पैशांनी मोजली जाते; पण विश्वासार्हता आणि अन्य मूल्यांबाबत भारतच जगात अव्वल असल्याचे ते म्हणाले.आयएमसी चेम्बर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजच्या वतीने डॉ. भागवत यांचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात ‘राष्ट्रीयत्व आणि व्यावसायिक नीतिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले. भागवत म्हणाले की, जगात भारतीय माणूस कुठेही गेला तरीही त्याचे स्वागत केले जाते आणि त्याच्याकडे आदराने बघितले जाते. भारतीयांनी प्राप्त केलेली ही विश्वासार्हता आहे. व्यापार, व्यवसाय हा एक धर्म आहे आणि त्याची काही नीतिमूल्ये असतात हे भारतीय समाज पूर्वापार मानत आला आहे.ते म्हणाले की, जगातील काही प्रगत देशांमध्ये आज ‘शट डाउन’ची वेळ आलेली असताना भारतीयांमध्ये सत्त्व जागृत झाले आहे. ‘आम्ही काही करू शकत नाही’ या पराभूत मानसिकतेतून भारतीय समाज बाहेर आला आहे. आमचा इतिहास, शौर्य, आमचे गुणविशेषांच्या सत्त्वावर इंग्रजांनी घाला घातला. आज ते पुन्हा जागृत झाले आहे. आम्ही करू शकतो; नव्हे आम्हीच करू शकतो हा भाव निर्माण झाला आहे. सीएसआर ही संकल्पना आज कायद्याने आणली गेली असली तरी ती भारतीय समाजात फार पूर्वीपासून आहे. आपल्यासोबतच आपल्या समाजाची समृद्धी साधली जावी, हेच आमचा व्यापारधर्म सांगत असल्याचे भागवत म्हणाले.म्हणून जपान महासत्ता-देशभक्ती, सर्व समाज एक परिवार असल्याची भावना, आर्थिक प्रगतीसाठी कुठलेही साहस करण्याची तयारी आणि विकासासाठी जोखीम पत्करण्याची तयारी यामुळे जपान महासत्ता बनू शकला. हे उदाहरण आमच्यासमोर आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
महासत्तेबरोबर भारत विश्वमित्र व्हावा, विश्वासार्हतेत भारतच अव्वल : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:43 AM