पुणे : भारताने १९७४ मध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आणि १९९८ मध्ये अटबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात अणुचाचणी करून जगाला संदेश दिला होता. त्यानंतर आता २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ३७० कलम हटवून जागाला प्रखर संदेश दिला आहे. अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे. स्वदेश रक्षण हाच बाजीराव पेशव्यांप्रमाणे आपला उद्देश होता, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’हिंदुस्थान सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मविभूषण डॉ. राजागोपाला चिदंबरम यांना खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान केला. खासदार गिरीष बापट, आमदार मेधा कुलकर्णी, उदय सिंह पेशवा, अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, अनिल गानू उपस्थित होते. सहस्त्रबुद्धे म्हणाले, परदेशात बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीचा अभ्यास केला जातो. मात्र, आपल्याकडे वीरांची उपेक्षा होत असून ती थांबविणे गरजेचे आहे. वीरांचे स्मारक होणे, आठवण ठेवण्याकरीता कार्यक्रम करणे आवश्यक असले, तरी बाजीराव पेशवे यांच्या रणनिती अभ्यासाविषयी साक्षरता होणे आवश्यक आहे.डॉ. चिदंबरम म्हणाले, कोणत्याही देशाचा विकास हा संरक्षणाविना आणि संरक्षण हे विकासाविना होणे अर्थहिन आहे. आपल्या देशाचा विकास झपाटयाने होत असला, तरी देखील सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्तक असणे आवश्यक आहे. केवळ शस्त्रास्त्र संपन्न किंवा संरक्षण शास्त्रापुरते नाही, तर उर्जा, पाणी व वातावरणाविषयी संरक्षण असणे गरजेचे आहे. आजच्या काळात सायबर सिक्युरिटी देखील अत्यावश्यक आहे. हिंदुस्थान संरक्षणासोबतच विकासही करीत असून नव्या तंत्रज्ञानाची ओळख देशाला करुन देणारा आपला देश असावा, ही आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उदयसिंग पेशवा, खासदार गिरीष बापट, भूषण गोखले यांनीही आपले विचार व्यक्त केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले.
३७० कलम हटवून भारताचा जगाला दिला प्रखर संदेश : विनय सहस्त्रबुद्धे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:16 PM
अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे...
ठळक मुद्देडॉ. राजागोपाला चिदंबरम यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’ प्रदान