Devendra Fadnavis: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात असून, राज्यासह देशातील नेते दौरे, सभा, रॅली यातून जनसंवाद वाढवताना दिसत आहेत. भारत ही जगातील गतिमानतेने वाढणारी अर्थव्यवस्था असून, लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते, असे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत देशवासीयांना आश्वस्त केले आहे. यातच सन २०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे. सामान्य माणसाचा तसेच गरीब माणसाच्या कल्याणाचा अजेंडा आखला जात आहे. सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना तयार होत आहे. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. २०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मागेल त्याला शेततळे राज्य सरकारकडून दिले जात आहे
मागेल त्याला शेततळे राज्य सरकारकडून दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी कुठलीही अट न घालता अनेक योजनांचा लाभ दिला जात आहे. केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्रच्या राज्य सरकारने ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारसोबतच आणखी सहा हजाराची भर घालून शेतकऱ्यांना आता सन्मान निधी १२ हजार रूपये दिले जात आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या धानाला पाचशे रुपयाचा बोनसही राज्य सरकारने दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना कुठलीही अट न ठेवता पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार मिळणार आहे. पुढल्या वर्षी पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे सिंचनाचे काम पूर्ण करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेतीला पाणी उपलब्ध उपलब्ध होऊ शकणार आहेत. आपलं राज्य सरकार हे सामान्य लोकांच्या गरिबांच्या तसेच शेतकऱ्यांच्या नेहमी सोबत आहे. गोसेखुर्दमध्ये जलसिंचनासोबतच साडेचारशे कोटींचा पर्यटन जलपर्यटनाचे काम सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.